मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि माहिती राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. बुधवारी २ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते.
शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.