अजित जगताप
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी खटाव तालुक्यात वडूज नगरीमध्ये धावता दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने मरगळ आलेल्या राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झाले. राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाला पुन्हा एकदा चावी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ गतीने मार्गक्रमण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १९९९ पासून ते २०१९ या कालावधीत सातारा जिल्ह्यात निर्विवादपणे सत्ता कायम राखण्यास यश मिळविले. परंतु, बदलत्या राजकीय भूमिकेमुळे अजितदादा पवार यांचे नाव घेऊन राजकारणात मोठे झालेल्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून इतर पक्षात जाण्यामध्ये धन्यता मानली. त्यामुळे स्वतःच्या कर्तबदारीवर खासदार -आमदार म्हणून निवडून आलेले वगळता इतर पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांना आजही अजितदादा पवार यांनी केलेल्या उपकाराची जाणीव आहे.
वडूजनगरीमध्ये सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांच्या दौऱ्याने अनेकांना राजकीय महत्त्वकांक्षा वाढली आहे .या दौऱ्यानिमित्त वडूज नगरीत अजितदादांनी जेष्ठ राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख, हिंदुराव गोडसे,नंदकुमार मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा बंडा गोडसे, दिलीप तुपे,राजू फडतरे, अनिल गोडसे, राजेंद्र कुंभार, किशोर सोनवणे, सुनिल गोडसे, पृथ्वीराज गोडसे, सुरेंद्र गुदगे,वडूज नगरीचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार,श्रीकांत काळे,अक्षय थोरवे, गणेश गोडसे व मान्यवर नेत्यांशी तसेच पक्षीय पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीबाबत योग्य मार्गदर्शन केले.
सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत महाविकास आघाडीनेही चांगलीच मोट बांधलेली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना सर्वसमावेशक अशा कार्यकर्त्याला संधी दयावी. असा एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे.
अजितदादांचा सातारा जिल्ह्यातील वडूज नगरीत हा दुसरा नियोजित दौरा होता. यापूर्वी वडूज पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आले होते .याला आता एक वर्ष होण्यास काही अवधी आहे. परंतु, नूतन वडून पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबत अजितदादांनी अनेक त्रुटी दाखवून त्याबाबत दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. पण, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. किंबहुना आपल्या नेत्यांनी केलेली सूचना पाळली जात नाही. हे राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
सत्ता असली की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यां भोवती कार्यकर्त्यांची गर्दी होत असते. नेत्यांचा गौरव केला जातो. त्यांचा शब्द झेलला जातो. पण सत्ता नसल्यानंतर नेत्यांच्या शब्दाला किंमत राहत नाही. कार्यकर्ते सुद्धा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. हेच यानिमित्त राज्यात दिसून आलेले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महत्त्वाचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. त्यांना अधिक बळ दिले तर भविष्यात माण- खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचा पुन्हा बालेकिल्ला अबाधित राहण्यासाठी कार्यकर्ते निश्चितच झटतील. असा विश्वास या निमित्त राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे यांनी सांगितले.