Nana Patole मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आयोजित सत्कार समारंभात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याचं आयोजन…!
नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी या घटनेवरून सरकारला घेरले आहे.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1648548864788496384
दरम्यान या कार्यक्रमातील चेंगराचेंगरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून पुन्हा एकदा सरकारला विरोधी पक्षाकडून जाब विचारत धारेवर धरण्यात आले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षाकडून आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चेंगराचेंगरीचा व्हिडिओ ट्विट करत सरकार काय लवपत आहे असा सवाल केला होता. त्यानंतर आता कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्दा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
नाना पटोले ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो. असे ट्वीट पटोले यांनी केले आहे.
चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना नेमकी उष्माघातामुळे झाली की चेंगराचेंगरीमुळे असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.