Nagar News : नगर : भाजप हा पक्ष मुंडे-महाजनांचा पक्ष राहिलेला नाही. पक्षातील निष्ठावंत मंडळींना डावलले जाते आहे. बाहेरील नेत्यांना पक्षात घेण्यास हरकत नाही; मात्र, निष्ठावंतांना डावलले जाणार नाही याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी घ्यावी. सध्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात निष्ठावंतांचा अपमान होतो. कार्यक्रमाच्या नियोजनात विश्वासात घेतले जात नाही. कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यातील संवाद संपला आहे. अनेक पदाधिकारी, ठेकेदार कामात व्यग्र आहेत, अशी तोफ डागत स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या, पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरुद्ध तोफ डागली. (Loyalists in BJP are upset at the way father-sons work; Pay attention to the role of Fadnavis!)
भाजप पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या पाठबळाच्या आधारावरच महसूल मंत्री विखे यांचे पक्षातील महत्त्व वाढलेले असतानाच दुसरीकडे पक्षाचा स्थानिक पातळीवरचा आधार असलेल्या निष्ठावंत, जुन्या पदाधिकाऱ्यांनी विखे पिता-पुत्राविरुद्ध स्वतंत्र बैठक घेत बंड पुकारले. आता या निष्ठावंतांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे.
निष्ठावंतांनी खदखद व्यक्त केली
दरम्यान, पक्षाच्या तीन जिल्हाध्यक्षांची (शहर, नगर उत्तर व नगर दक्षिण) नवीन निवड प्रतीक्षेत असतानाच निष्ठावंतांनी खदखद व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्षांची निवड हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेवर वर्चस्व कोणाचे, विखे गटाचे की निष्टावंतांचे? या वादातून या नियुक्त्या लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते. (Nagar News) सध्या जिल्ह्यात खासदार, आमदार, जिल्हा बँक अध्यक्षपद अशी प्रमुख पदे पक्षाबाहेरून आलेल्यांच्या पदरात पडलेली आहेत. राम शिंदे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरी राज्यात सत्ता मिळूनही पक्षातील निष्ठावंत लाभाच्या पदापासून उपेक्षितच राहिले आहेत. महामंडळे, विविध सरकारी समित्यांवरील नियुक्त्या होण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर पडलेल्या, जिल्ह्यातील आपली कामेही मार्गी लागत नाहीत, अनेक कामे विखे गटाकडे जात आहेत, यातून पक्षातील अस्वस्थता वाढीत आहे.
दरम्यान, पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलत विखे पिता-पुत्रांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवाला विखेच जबाबदार असल्याची तक्रार त्यावेळी फडणवीस यांच्याकडे प्रमुख पराभुतांनी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. (Nagar News) या तक्रारीनंतरही फडणवीस यांच्याकडून विखे यांना पाठबळ मिळत गेलेले आहेच. मंत्री विखे यांनी जिल्हा बँकेत सत्ताबदल घडवल्यानंतर तर महत्त्व अधिकच वाढले. त्यानंतर माजी मंत्री राम शिंदे व विखे पिता-पुत्रात खटके उडाले. आमदार शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींचेही लक्ष वेधले. त्यावरही पक्षाकडून अद्याप उपायोजना करण्यात आलेली नाही.
विखे यांच्याबाबत तक्रारी असतानाच आता पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी विखे पितापुत्रांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. विखे यांची भाजपमधील आजवरची कार्यपद्धत पाहिली तर या निष्ठावंतांच्या आवाजाला पक्षश्रेष्ठींकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरच पक्षाचे जिल्ह्यातील भवितव्य अवलंबून राहणार आहे. विखे पूर्वी काँग्रेसमध्ये असताना, शिवसेनेत गेल्यानंतरही आणि आता भाजपमध्ये आल्यानंतरही, ते विरूद्ध पक्षातील इतर सर्व असेच चित्र कायम राहिले. युती सरकारच्या काळात विखे कृषिमंत्री असताना शिवसेनेतील त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्याविरुद्ध बैठका घेत श्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. काँग्रेसमध्येही तुल्यबळ अशा थोरात गटाशी विखे यांचा कायमच संघर्ष राहिला. थोरात-विखे गटाचे अनेक वाद कायमच दिल्ली दरबारी पोहोचत असत.
नगर जिल्ह्याचे प्रभारीपद सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. प्रभारी असले तरी फडणवीस गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकदाच आले. पक्षातील निष्ठावंतच असंतोष व्यक्त करू लागल्याने फडणवीस हा प्रश्न कसा हाताळतात याकडे लक्ष राहणार आहे. निष्ठावंतांच्या बैठकीस प्रामुख्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जुने पदाधिकारी उपस्थित होते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुजय विखे करतात. ते व नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील राजकीय मैत्रीतून पक्षात असंतोष वाढलेला आहेच. मात्र, त्याची फिकीर विखे यांनी कधीच केली नाही.
दरम्यान, निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम कसबा (पुणे) व कर्नाटकमध्ये दिसला. या दोन्ही निवडणुकांतून पक्षाचे मूळ मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्यानेच तेथे पक्षाचा पराभव झाला, असे सूचक इशारेही निष्ठावंतांनी बैठकीत दिले आहेत. त्यामुळेच फडणवीस हा प्रश्न कसा हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का; सभापती, उपसभापती भाजपचेच!
Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..