पुणे : राज्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगरपरिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाच्या विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील २५ जिल्हा परिषदा, १८ महापालिका, दोन हजार १६४ नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे या निवडणुका नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत होणार आहेत. आणि पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांची आणि दुसऱ्या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती व ग्रामपंचयतींची निवडणूक घेण्याचे नियोजन सुरू आहे.
जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगरपरिषदा व पंचायत समित्यांची मुदत संपल्यापासून महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिकांवरील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. आता ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी ग्रामसेवक प्रशासक म्हणून काम पाहतील. सर्वच अधिकारी प्रशासक म्हणून काम करत असतील तर उर्वरित कामे कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर यांचा मुदत संपलेल्या महापालीकांमध्ये समावेश आहे. तर अमरावती, चंद्रपूर, सातारा, जालना, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, बुलडाणा, औरंगाबाद, वर्धा, लातूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली या २५ जिल्हा परिषदांची मुदत संपली आहे.