Mumbai News : मुंबई : शिवसेनेचा वर्धापनदिन कोण साजरा करणार, यावरून दोन्ही गटांमध्ये सामना रंगला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट परस्परांवर कुरघोडी करत आहे. ठाकरे गटाने ‘जागतिक खोके दिन’ तुम्ही साजरा करा, असा सल्ला शिंदे गटाला दिल्याने वादंग उठले आहेत. या पार्श्वभूमीवर आता जनता कोणाबरोबर आहे हे आगामी निवडणुकांमधील जनतेच्या कौलावरूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गट आम्हीच ताकदवाद आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार हे नक्की!
वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला दोन धक्के
दरम्यान, वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला दोन धक्के बसले. आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी, आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली. विधानसभेतील ४० आमदार फुटले असले तरी विधान परिषदेत ठाकरे गटात फूट पाडण्यात शिंदे यांना यश येत नव्हते. (Mumbai News) अखेर ठाकरे गटाचा दुसरा आमदार फोडण्यात शिंदे गटाला यश मिळाले. या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाला जनतेचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्याआधी ठाकरे गटाच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनीही आपलीच शिवसेना जनमानसाच्या मनात असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये अंधेरीत ठाकरे गट तर पुण्यातील कसबा पेठेत काँग्रेसने विजय मिळविला. अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटाला शह देण्याचे बरेच प्रयत्न केले. अगदी उमेदवार रुजूता लटके यांचा मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर होणार नाही अशी व्यवस्था केली होती. (Mumbai News) पण उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला होता. अंधेरीत भाजपने आधी उमेदवारही जाहीर केला होता. पण ऐनवेळी भाजपने माघार घेतली होती. अंधेरीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच भाजपने माघार घेतल्याचा आरोप तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केला होता.
शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती मतांमध्ये रुपांतरित होण्याची भीती असल्यानेच भाजप अधिक सावध झाला होता. येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.(Mumbai News) त्या निवडणुका झाल्याच तर शिवसेनेतील ठाकरे की शिंदे गटापैकी कोणाला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होतील.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यामागे भाजप आणि शिंदे गटाचा हात असल्याचा आरोपही ठाकरे गटासह काँग्रेस व राष्ट्रवादीने केला होता. (Mumbai News) आता जनतेचा पाठिंबा ठाकरे की शिंदे गटाला आहे हे मतदान यंत्रातून जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत दोन्ही गट आपणच खरे वा जनतेचा आपल्यालाच पाठिंबा हा दावा करीत राहतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ठाकरे गटाच्या आणखी एका साथीदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र!