Mumbai News : मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (ता. २) कर्जतच्या एन.डी. स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. विधिमंडळात आज राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. देसाई यांच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात संशय आहे. कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, नितीन देसाई यांची आठवण म्हणून एनडी स्टुडिओचे कसे संवर्धन करता येईल, तो ताब्यात घेता येईल का, याविषयी कायदेशीर बाबी तपासल्या जातील. आताच त्याबद्दल घोषणा करता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सखोल चौकशी करण्याची मागणी
दरम्यान, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी आज सभागृहात नितीन देसाई यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. (Mumbai News) अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन देसाई यांनी मराठी चित्रपटात वेगळी छाप उमटवली. नितीनजी यांनी उत्तम काम केले. जे पाहतोय, ऐकतोय ऑडिओ क्लिपमधून त्यांनी पुरावे दिले आहेत. कर्ज वसुलीसाठी लोक जाचक पद्धतीने त्यांच्या मागे लागले होते का, असे इम्प्रेशन तयार झाले आहे. लिलाव न करता शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शनात चांगले बस्तान बसवले. मराठी माणसाला अभिमान वाटावा असे काम त्यांनी केले. दिल्लीमधील चित्ररथ आपण त्यांच्याच माध्यमातून तयार करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील घाट सुंदर बनवले, त्यामध्ये त्यांचे योगदान आहे. एका अतिशय हरहुन्नरी कलावंत, कलादिग्दर्शकाचा मृत्यू अतिशय दुर्देवी आहे. या गोष्टीची सखोल चौकशी होणार आहे. (Mumbai News) देसाई यांच्यावर करोडोंचे कर्ज होते. स्टुडिओ गहाण ठेवला होता, निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. कुठे जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला का? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का? याची सखोल चौकशी सरकार करेल, असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
नितीन देसाई यांची आठवण म्हणून एनडी स्टुडिओचे संवर्धन करता येईल, तो ताब्यात घेता येईल का? याविषयी कायदेशीर बाबी तपासल्या जातील. आत्ताच त्याबद्दल घोषणा करता येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : नितीन देसाई यांच्यावर २४९ कोटींचे कर्ज; आर्थिक तंगीमुळेच घेतला टोकाचा निर्णय…!
Mumbai News : शेतकऱ्यांना दिलासा, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार; सरकारचा मोठा निर्णय!