पुणे : गुजरात निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अमोल कोल्हे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे खासदार डॉ. कोल्हे यांच्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांना सर्वाधिक ओळखले जातात, मात्र पक्षाने त्यांना या यादीतून वगळल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे.
दरम्यान अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यामागे पक्षातील राजकारण असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या वतीने शिर्डी येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखेल हाताला बँडेज बांधून थेट मुंबईवरून पोचले होते. परंतु खासदार आमोल कोल्हे यांनी या शिबिराला दांडी मारलीहोती . त्यामुळे अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.
अमोल कोल्हे यांनी मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत डॉ. कोल्हे याच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याचे चर्चांमधून दिसून येत होते. यातच पक्षाने त्याचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून कमी केल्याने खासदार कोल्हे यांना मोठा धक्का मानला जात आहे.