पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोहोळचे आमदार यशवंत माने अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी केले होते. जवळपास दोन वर्षांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी प्रक्रिया आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत मानेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत म्हटलं आहे की, एससी जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून आमदार यशवंत माने यांनी तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी आता सीबीआयकडून चैकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आमदार माने यांनी बुलडाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी असल्याचे दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी देखील काढली आहे, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत मानेंवर अनेक वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांच्या कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगिरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील तक्रारीत केला आहे. दरम्यान, सीबीआयकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून लवकरच याबाबत चौकशी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.