पालघर : पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील 12 तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचे विधानसेभेचे तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी दिली होती. दरम्यान, आमदार श्रीनिवास वनगा हे बेपत्ता असून त्यांचा फोन नॉट रीचेबल लागत आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. मात्र, श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले होते. काल सोमवारी (28 ऑक्टोबर) त्यांनी माध्यमांशी संवाद साधत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका देखील केली होती. मुख्यमंत्री शिंदेंनी फसवणूक केल्याचा आरोप करताना भावूक झालेल्या श्रीनिवास वनगा यांनी उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, अशी भावना व्यक्त केली आहे.
आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरे यांनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंडात आमदार वनगा यांनी शिंदेंना साथ दिली होती. पण त्याच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांपैकी केवळ वनगा यांचेच तिकीट कापलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच, याच तणावातून टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागल्याचे त्यांनी सांगितलं होतं. अशातच आता ते नॉट रिचेबल असल्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. त्यात आमदार श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे.