सोलापूर : माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्याच्या गेटवर ५ जणांनी स्फोटके फोडल्याची धक्कादायक घटना २३ ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारस घडली होती. हि स्पोटके आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी फोडली असल्याचा गंभीर आरोप दिलीप सोपल यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपल कुटुंबीय मध्यरात्री आपल्या निवासस्थानात झोपेत असताना अचानकपणे प्रचंड आवाजाच्या स्फोटके फोडण्याचा प्रकार घडला. तेव्हा झोपेतून जागे झालेल्या सोपल यांनी निवासस्थान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा निवासस्थानासमोर प्रवेशद्वारावर पाचजण प्रचंड आवाजाची स्फोटके फेकत असल्याचे दिसून आले. दोन स्फोटके प्रवेशद्वाराच्या आत येऊन पडली. तर एक स्फोटक प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर पडले.
या प्रकरणी दिलीप सोपल यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करीत आहेत.
दरम्यान, सोपल यांनी आमदार राउत यांच्यावर केलेल्या आरोपामुळे दोन्ही गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सतत राजकीय वाद उफाळून येत असतो. दोन महिन्यांपूर्वी आर्यन शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला होता.