दिनेश सोनवणे
दौंड : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गासंबंधित विविध समस्या व दौंड तालुक्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली आहे.
सप्टेंबर महिन्यात नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली होती.
सदर बैठकीमध्ये आमदार राहुल कुल यांनी पुणे – सोलापूर महामार्गा संबंधित विविध समस्या मांडल्या होत्या. त्यापुढील पाठपुराव्यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे.
राहुल कुल यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता (लांबी २४.९ कि.मी.) या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड येथे अतिरिक्त नवीन अंडरपास बांधण्यात यावा.