दीपक खिलारे : इंदापूर
Indapur News : इंदापूर, (पुणे) : वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करण्याबाबत आमदार दत्तात्रय भरणे हे आमदार आणि त्यानंतर राज्यमंत्री पदावर असताना ते इतके वर्षे गप्प का होते? असा सवाल इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी उपस्थित केला आहे.
पाटील यांचे माध्यमातून मालोजीराजेंच्या गढीचा विषय मार्गी लागत आहे असे दिसू लागताच, त्यानंतर घाईघाईने यासंदर्भातील प्रश्न भरणे यांनी विधिमंडळात उपस्थित करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोपही त्यांनी भरणे यांच्यावर केला आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मालोजीराजे गढी संवर्धन व स्मारक व्हावे या संदर्भात इंदापूर येथे भाग्यश्री बंगला येथे शिवप्रेमींची ७ मार्च रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्याने आता गढीचे संवर्धन व स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लागणार असून, सदर कामांसाठी सुमारे १० कोटी निधी लागेल, असे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले होते.
दरम्यान, शिष्टमंडळ घेऊन सांस्कृतिक व इतर मंत्र्यांना भेटण्याचे व मंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे या शिवप्रेमींच्या बैठकीत ठरविण्यात आले. पाटील यांनी मुंबईत मंत्रालयामध्ये मार्च सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शिवसेना-भाजप युती सरकार कडून गढीचे संवर्धन करणे व संबंधित बाबींवर चर्चा केली होती. असेही यावेळी जामदार यांनी सांगितले.