पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २०नोव्हेंबर) राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, कर्वे समाजसेवा संस्था-पुणे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र-पुणे या सहयोगी संस्था सुद्धा सहभागी होणार आहेत, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड, कमिन्स कंपनीच्या मागे, पुणे-४११०३८ येथे दुपारी २.३० ते सायंकाळी ६ दरम्यान ही परिषद होणार आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनमानामुळे कित्येकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताण-तणाव जाणवतात. परिणामी बऱ्याच जणांना काही आजारांना सामोरे जावे लागते. हे ताण-तणाव टाळून सर्वसाधारण आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी प्रत्येकाचे मानसिक आरोग्य सुदृढ़ असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन चव्हाण सेंटरच्या आरोग्य विभागामार्फत येत्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील प्रसिद्ध मानसतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार असून यात डॉ. सुवर्णा बोबडे, डॉ. हमीद दाभोळकर, डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ चंद्रशेखर देसाई हे परिषदेतील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत
ही परिषद रविवारी (दि. २०) दुपारी २ वाजता सुरु होईल. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आपली इच्छा असून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी तसेच डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य मित्र, आरोग्य सुविधांमध्ये काम करणारे स्वयंसेवक आदींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या https://chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे त्या म्हणाल्या.
परिषदेस उपस्थित राहण्याकरीता पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी सुकेशनी मर्चंडे (८६५२११८९४९), वंदना वाळींजकर (८१६९४९३१६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या आरोग्य विभागाचे संयोजक विजय कान्हेकर व विभाग प्रमुख दिपिका शेरखाने यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी चव्हाण सेंटरच्या https://chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तसेच https://forms.gle/PstPkEdN6WjjPb7G8 या लिंकवर आपली नावे नोंदवावीत