राहुलकुमार अवचट
यवत : खडकवासला कालवा तसेच जलसंपदा विभागासंबंधित विविध समस्यांसंदर्भात आज जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ विलास राजपूत साहेब व पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री. हनुमंत गुणाले साहेब यांचे समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी पुढील प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली –
१)मुळशी धरणाचे पाणी टप्याटप्याने पूर्वेकडे वळविण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीचे अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात यावी.
२) खडकवासला धरणसाखळीतील नवीन व जुना मुठा उजवा कालवा अस्तरीकरण ,पोटचाऱ्या व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे पूर्ण कारण्यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
३) जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी या गावांतील तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे.
४)यंदा चांगला पाऊस झाल्याने खडकवासला साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत पुणे शहराबरोबर, दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासाठी पिण्याचा व शेतीच्या पाण्यासाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे.
५)पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे वापरलेले ज्यादा पाणी पुनर्प्रक्रिया करून सिंचनासाठी मिळावे, सांडपाणी शुद्धीकरणासाठी जायका प्रकल्प जायका सांडपाणी प्रकल्प कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यात यावा.