Maratha reservation : परभणी : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. असेच चित्र परभणीतही पहायला मिळाले. त्या संबंधीत फलकही लावण्यात आले आहेत. असे असताना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी संतप्त मराठा बांधवांनी त्यांची गाडी अडवली. गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असताना सुद्धा तुम्ही गावात कसे आले. असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही फिरू नये, अन्यथा तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे देखील यावेळी मराठा समाज बांधवांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना ठणकावले. यावेळी आ. रत्नाकर गुट्टे यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देऊन आंदोलनाला समर्थन दर्शवलं.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. तर याचा फटका राजकीय नेत्यांना बसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परभणी जिल्ह्यामध्ये विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. गावबंदी केली असताना सुद्धा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.