आंतरवाली सराटी (जालना) : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली आहे. अन्न, पाण्याचा त्याग आणि औषधोपचारालाही मनाई केल्यामुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली आहे. काही वेळापूर्वी महंतांनी आग्रहाने जरांगेंना पाणी पाजले. पण, जरांगेंना पाणीही घोटवत नाहीये. सकाळपासून त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. पोटदुखीच्या वेदनांनी ते व्हिवळत होते.
आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणामुळे बुधवारी मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. औषधे देण्यात आली. उपोषणस्थळी जरांगेंना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत. ‘पाणी घ्या’ म्हणत उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.
जरांगे भूमिकेवर ठाम
मनोज जरांगेंची भूमिका ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात व्हावे, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा सलग सहावा दिवस असल्याने जरांगेंना पोटदुखीचा त्रास होत आहे.
सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी
सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे. सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर, उपोषण करतच मुंबईत घुसणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.