मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुर्नवसन करताना काँग्रेसने त्यांच्याकडे तेलंगणाचे प्रभारीपद सोपविले आहे. सध्याच्या घडीला अंतर्गत वादविवाद यांच्यामुळे तेलंगणा काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याने या ठिकाणी माणिकराव ठाकरे याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तेलंगणात माणिकराव ठाकरे हे पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशाने सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे यांना नियुक्तीचे पात्र दिले आहे. यावर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे, त्या पार्शवभूमीवर काँग्रेस कडून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळेच ठाकरे यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आले आहे.
माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून २००८ ते २०१५ या काळात कामकाज महिले आहे. त्यामुळे संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच ठाकरे यांनी विधान परिषदेचे उपसभापती, गृहराज्यमंत्री, ऊर्जा राज्यमंत्री अशी पदे भूषविली आहेत. त्यांच्या याचा अनुभवाचा फायदा करून काँग्रेसला तेलंगणात होऊ शकतो.
माणिकराव ठाकरे यांना राज्याबाहेर प्रथमच जबाबदारी देण्यात आली आहे. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रेवंथ रेड्डी व काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. रेड्डी यांना अनुकूल असणारे निर्णय माजी प्रभारी मणिकाम टागोर घेत असल्याचा आरोप इतर नेत्यांनी केला होता. त्यामुळे टागोर यांच्या जागी ठाकरे यांची वर्णी लागली आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे व भाजपाचे आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे.