नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि विरोधी पक्ष इंडिया अलायन्सकडून जोरदार तयारी केली जात आहे. विरोधी पक्ष इंडिया अलायन्सकडून नुकतीच मल्लिकार्जुन खरगे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर सर्वांनी एकमत नोंदवले आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर इंडिया आघाडीची कमान राहणार आहे.
यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र नितीश कुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. विरोधी पक्ष इंडिया अलायन्सकडून नुकतीच मल्लिकार्जुन खरगे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आल्याने खरगे आता विरोधी गटाचा चेहरा असतील. खरगे यांना प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाचे महत्त्वाचे आव्हान पेलावे लागणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्षहिताबरोबरच आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे.
इंडिया आघाडीच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर आता जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयक पदावरही चर्चा झाली. नितीश कुमार यांच्या नावाचा काँग्रेसने प्रस्ताव ठेवला होता. मात्र नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. आपल्याला कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नसल्याचे नितीश कुमार म्हणाले. तळागाळात युतीचा विस्तार करणे आवश्यक आहे. महायुतीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकजूट असणे गरजेचे आहे. त्यासाठी काम करणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.