मुंबई : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले आहे तर महायुतीच्या पदरी घोर निराशा आली आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाला विधान सभा निवडणुकीत चांगली कामगिरी करायची आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. तर महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महाविकास आघाडीशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 288 सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील भागीदार-काँग्रेस, NCP (SP) आणि शिवसेना यांनी मान्य केलेला फॉर्म्युला 96 : 96 : 96 आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. समान जागांवर आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्यानं बोलताना सांगितलं की, “जागावाटपाचा ठरल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन मुख्य पक्ष त्यांच्याशी संबंधिक इतर घटक पक्षांना (छोट्या पक्षांना) आपापल्या वाट्यातील जागा देतील. म्हणजे, काँग्रेस समाजवादी पक्षाला, शरद पवार शेतकरी आणि कामगार पक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डावे पक्षांना आपल्या वाट्याच्या जागा देतील. तसेच, जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी इच्छुक असेल, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार?
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता आगामी विधानसभेतही भाजपनं महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. महायुतीत भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीची काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष आहेत.
कायम म्हटले नाना पटोले?
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि येत्या काही दिवसांत आणखी अनेक बैठका होणार आहेत, अशी माहिती खुद्द शरद पवारांनी दिली. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. लोकसभेत काँग्रेस 13 खासदार आणि एक अपक्ष खासदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, युतीच्या हितासाठी काँग्रेसनं काही जागांची जुळवाजुळव करण्याची तयारी दर्शवली आहे.