पुणे : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीने देखील मेळावे आणि सभांना सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पुण्यातील कॉंग्रेसभवनमध्ये पार पडत आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.
त्याशिवाय, कॉंग्रेस नेते नाना पटोले, ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, आमदार रविंद्र धंगेकर, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगपात, काँग्रेसचे रमेश बागवे, अरविंद शिंदे हे सगळे उपस्थित आहेत.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा झाल्या. मात्र, त्यानंतर या सभांना खंड पडला. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आणि त्यानंतर कॉंग्रेस नेते अशोक चव्हानांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे सगळे धक्के पचवून पुन्हा एकदा महाविकास आघाडीने सभांना सुरुवात केली आहे.
मेळाव्यात महाविकास आघाडी अधिक भक्कम करण्याबरोबरच तिन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करतील. पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती या चार मतदार संघातील महाविकास आघाडी पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित आहेत.
महाविकास आघाडीची रणनिती ठरणार?
या मेळाव्यातून महाविकास आघाडीची पुढची रणनिती कशी असेल?, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं आहे? त्यासोबत शरद पवार गटाचं चिन्ह घराघरापर्यंत कसं पोहोचवणार? या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.