पुणे : गोव्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजेच ८ आमदार बुधवारी (ता. १४) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानुसार पर्वरी येथील विधानसभा सचिवालात हालचाली सुरू झालेल्या असून काही काँग्रेसचे आमदार सचिवालयामध्ये दाखल झाले आहेत.
गोव्यामध्ये काँग्रेसला योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यास गोव्यातील आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्यामुळे गेले अनेक दिवस विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना या पदावरून काँग्रेसने हटवले असले तरी त्यांच्या जागी दुसरा काँग्रेस विधिमंडळ नेता निवडला गेलेला नाही.
काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे पदयात्रेमध्ये असल्याने व त्याच्याच भोवती सगळे काँग्रेसचे नेते असल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाहीत. काँग्रेसला गोव्यामध्ये कोणी विचारत नाही. काँग्रेसला योग्य नेता नाही आणि मतदारांची कामे व्हायला हवीत असा नाराजीचा सूर काँग्रेसचे आमदार व्यक्त करताना दिसतात.
दरम्यान या आमदारात माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो तसेच नुवेचे काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासह इतर काही आमदारांचा समावेश आहे.