मुंबई : दिल्ली येथे श्रद्धा वालकर हिचा आफताबची पूनावालाने हत्या केली होती. या हत्येने संपूर्ण देश हादरला असताना, या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. श्रद्धा वालकर हिने दोन वर्षांपुर्वीच आफताबच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून तक्रार केली होती. मात्र, या प्रकरणावर पोलिसांनी पाठपुरावा का केला नाही, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. यावर महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून श्रद्धाच्या प्रकरणात दोशींची गय केली जाणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
श्रद्धा वालकर प्रकरणात कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा दिली जाणार असून या पूर्ण प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. असे देखील गृहमंत्री शहा म्हणाले. श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “जे पत्र समोर आले आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धाने महाराष्ट्रातील एका पोलीस स्थानकात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिला जीवेमारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी कोणतीही कारवाई झालेली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचे सरकार नव्हते, त्यामुळे त्यावेळी जे कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”