-युनूस तांबोळी
पुणे : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असे म्हटले जाते. बहुतेक राजकारणी हे बेरजेचे राजकारण करताना दिसतात. त्यामुळे आपआपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांना जोपासण्याची काळजी घेतात. पाच वर्षे निवडून जाण्यासाठी जमा केलेल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांची सांगड घालण्याचे काम केले जाते. त्यातून पाच वर्षे सत्ता उपभोगण्याचे काम चाणाक्ष राजकारणी करत असतात. लोकसभेची निवडणूक प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करत लढवली जाते.
प्रत्येक लोकसभा मतदार संघ मोठा असल्याने उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागते. जो यामध्ये वातावरण निर्मिती चांगली करतो. त्याचा विजय निश्चित ठरत असतो. पण विधानसभा निवडणुकीत त्या प्रमाणात कमी मतदारांपर्यंत पोहचावयाचे असते. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. पण राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये नेते सत्तेला हपापलेले, कार्यकर्ते विभागलेले तर मतदार भरकटलेले अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मताचा गठ्ठा कोणाचा भक्कम, कोणाला मतदार कौल देणार, मतदार कोणाची जीरवणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा राज्याच्या विधानसभा मतदार संघामध्ये होऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगवेगळी सत्तातंर झालेले पहावयास मिळालेले आहे. कोणी आमदार पळून नेत सत्ता उभी केली. त्यातून चिन्ह कोणाचे याचा वाद निर्माण झाला. खरा पक्ष कोणाचा, खरा पक्ष कोणी काढला यातून वेगवेगळी मते निर्माण होऊन सत्तेसाठी सर्वकाही करत फक्त सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांनी पळापळ सुरू केली. यामध्ये काही राजकारण्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळवत सत्तेच्या बाकावर अधिराज्य मिळविले. याच काळात भ्रष्ट नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. त्यातून वेगवेगळ्या नोटीसा बजावण्यात आल्या. काहींनी याला न घाबरता आहे त्या पक्षात राहून सीबीआय, इडी ला सामोरे गेल्याचे दिसून आले. काही नेत्यांनी मात्र वेगळी भुमिका घेत पक्ष, चिन्ह घेऊन वेगळी भुमिका घेतली. सत्ताधाऱ्याशी हातमिळवणी करत सत्तेच्या बाकावर स्थान मिळवले. त्यातून मुळ पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचे अशा वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. सत्ता मिळवत राज्याचा विकास करायचा हेच सांगत नेत्यांनी उड्या मारल्याचे संपुर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे.
प्रत्येक पक्षाचे आपले कार्यकर्ते हे गावागावत असतात. खर तर गावातल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून गावात गट तट निर्माण झालेले असतात. त्यातून संघर्ष होऊन कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर राहून आपल्या नेत्याला निवडून आणतात. हे पक्षाच्या बांधणीवर अवलंबून असते. एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले. चिन्हात देखील बदल झाले. राज्याच्या राजकारणात एकाच पक्षातील नेत्यांनी घेतलेली वेगळी भुमिका याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर झाला. भावकीत वाद असतो तसा वाद एकाच गावातील एकाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षाची केलेली बांधणी यामध्ये विभागणी झालेली पहावयास मिळू लागली आहे. एका पक्षातील विभागणी त्याचा फायदा दुसऱ्या पक्षाला मिळणार काय असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे पुर्वी एकाच पक्षात असणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या वाटेवर दिसणार आहेत.
सध्या मात्र पक्षांची झालेली मोडतोड व नेत्यांच्या सत्तेसाठी झालेली पळापळ यातून कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाची पुर्नबांधणी, कार्यकर्ते, मतदार यांची सांगड घालताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. यामध्ये मात्र मतदार भरकटला असल्याचे जाणवू लागले आहे. गुपीत मतदान करून आपले अमुल्य मत देणारे मतदार खुले आम चर्चा करताना पहावयास मिळू लागले आहे. यावेळी मात्र मतदार हा कोणत्याही नेत्याचे किंवा कार्यकर्त्याचे ऐकणार नाही. त्यामुळे विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.