पुणे : लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती.
यासोबतच आष्टी पाटोदा येथील शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात रिंगणात उतरणार असल्याने तेदेखील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.