अकोला : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि सोबत मागील लोकसभेतील पराभवाचं कारण सुद्धा सांगितले आहे. महादेव जानकर म्हणाले कि पुढची म्हणजे 2029 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं जानकर बोलत होते. जानकर यांचा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून परभाव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी जानकर यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता.
परभणी लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे कारण?
परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचेही जानकर यांनी सांगितले. बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
पिक विमा कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा
अकोला जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. या कंपन्यावर केसेस केल्या तरच या कंपन्या ताळ्यावर येतात, असेही जानकर म्हणाले.