पुणे : ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री व भाजपा नेत्या रुपा गांगुली यांना बांसद्रोणी पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सकाळी कोलकाता पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र आता पोलिसांनी यांना अटक केली आहे.
रुपा गांगुली यांना अटक करण्याचं नेमकं प्रकरण काय?
बुधवारी सकाळी ( दि. 2 ऑक्टोबर ) कोलकाता येथे इयत्ता नववीमधील एक विद्यार्थी कोचिंग सेंटरला जात होता. याच परिसरात रस्त्याचं काम देखील चालू होतं. या विद्यार्थ्याला जेसीबीने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर बांसद्रोणी ( कोलकाता ) प्रभाग क्रमांक 113 च्या स्थानिक नगरसेवक अनिता कर मजुमदार या परिसरात उपस्थित राहिल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यानंतर रस्त्यावर निदर्शने सुरू झाली. यावेळी भाजप नेत्या रुबी मोंडल यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ बुधवारी रात्री रुपा गांगुली यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी बांसद्रोणी पोलीस स्थानक गाठले.
रुपा गांगुली यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर आरोप केले आहेत. गांगुली यांनी दावा केला की दास आणि इतर भाजप समर्थक शांततापूर्ण आंदोलन करत होते. जेव्हा त्यांच्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आंदोलकांनाच अटक केली, असा रोष रुपा गांगुली यांनी व्यक्त केला. अटक केल्यानंतर गांगुलीने आरोप केले की, पोलिसांनी त्यांना बॅगही घेऊ दिली नाही. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गांगुलीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, रुपा गांगुली यांनी महाभारत मध्ये साकारलेल्या द्रौपदीच्या भुमिकेने त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. नंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यही झाल्या.