राजेंद्र कुमार गुंड
(Madha News) माढा : तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या सन 2023 – 28 करिता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. संचालक मंडळाच्या 11 जागांसाठी 11 जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याच्या घोषणेची फक्त औपचारिकताच बाकी उरली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी.मोरे यांनी कामकाज पाहिले.
सन 1997 मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले यांच्या नेतृत्वाखाली सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होत आहे. सध्या पतसंस्थेचे 685 सभासद असून 6 कोटी 25 लाखांच्या ठेवी आहेत. शेअर्स 50 लाखांचे आहेत तर कर्ज वाटप 6 कोटींच्या आसपास केले आहे. संस्थेला मागील आर्थिक वर्षात 3 लाख 75 हजार इतका नफा झाला आहे. शासनाच्या धोरणानुसार पतसंस्थेच्या इतर बँकेमध्ये 2 कोटी 25 लाखांच्या मुदत ठेवी आहेत.
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुरुवातीला 11 जागेसाठी 15 जणांनी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एक अर्ज छाननीत अवैद्य ठरला तर इतर तिघांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे फक्त 11 अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या संचालकामध्ये संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले, नारायण खांडेकर, मोहन कदम, दत्तात्रय खैरे, सतीश शेंडगे, सौदागर गव्हाणे, विनोद भुसारे, अनिलकुमार बरकडे, अविनाश माने, संगीता अंगत कदम, राजश्री सुरेश शेंडगे यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पतसंस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत चेअरमनपदाची धूरा अनिलकुमार अनभुले व त्यांच्या पत्नी संगीता अनभुले यांनीच यशस्वीपणे सांभाळली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
मागील 25 वर्षापासून पतसंस्थेचा कारभार अत्यंत काटकसरीने व पारदर्शकरित्या आणि सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून केला आहे. सध्या पतसंस्थेच्या विठ्ठलवाडी व माढा येथे शाखा उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहेत. पतसंस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून दरवर्षी नफा मिळतो. त्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम व मजबूत आहे. या नफ्यातून सभासदांना लाभांश वाटप केले जाते. तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे व प्रामाणिक कर्मचारी, सर्व सभासद, ठेवीदार, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी माझ्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीवर पूर्णतः विश्वास ठेवून सलग पाचव्यांदा पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले.
– अनिलकुमार अनभुले, संस्थापक, श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था.