के.बाप्पू
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : एकीकडे अजित पवार हे राष्ट्रवादीसह युतीमध्ये सामील झाले असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांच्या पदांच्या मिळकतीमध्ये वाटेकरी वाढले आहेत. त्यामुळे नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही हिरमुसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्तेही कालपासून “कोणता झेंडा घेऊ हाती?” या विचारात गुरफटले आहेत. परंतु आता न बोलता सहन करण्याशिवाय अनेकांसमोर पर्याय नाही, असे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.
नेत्यांचा नाराजीचा सूर
२०१४ नंतर भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी अशा जिल्ह्यातील अनेकांना अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री विराजमान झाले, ही गोष्ट खटकली आहे. (Loni Kalbhor News ) हर्षवर्धन पाटील, राहुल कुल व प्रदीप कंद यांना अनुक्रमे इंदापूर, दौंड व शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवायची आहे. मात्र, कालच्या अनपेक्षित घटनेमुळे भविष्यात नक्की काय होईल, ही भिती वरील तीनही नेत्यांसह जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सतावत असल्याचे चित्र आहे.
समित्यांमध्ये आता वाटेकऱ्यांची भर
शिवसेना आणि भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, कार्यकर्ते ज्यांचे लक्ष विविध महामंडळे आणि समित्यांवर होते, त्यांनाही आता पदासाठी प्रतीक्षा करावी लागणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तालुका स्तर ते जिल्ह्यास्तरापर्यंतच्या विविध समित्यांमध्ये आता युतीबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही वाटा असणार, हे सत्य नाकारून चालणार नाही. (Loni Kalbhor News ) याच पद्धतीने आता विविध विकासकामांच्या निधी वाटपातही तिन्ही पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर पडली आहे. आधीच कार्यकर्त्यांमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी पदापासून ते विविध समित्यांवरील नियुक्ती न झाल्याबद्दल नाराजी असताना त्यात आता वाटेकऱ्यांची भर पडली आहे.
कार्यकर्ते म्हणतात, लढायचे कुणासाठी?
पुणे शहर व जिल्ह्यातील तालुका व गाव पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्तेही कालपासून “कोणता झेंडा घेऊ हाती?” या विचारात गुरफटले आहेत. सोशल मीडियात येणारे विविध विनोदी “मिम्स” जवळचे मित्र पाठवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत. (Loni Kalbhor News ) दुसरीकडे २०१४ नंतर भाजपमध्ये गेलेले व मूळचे भाजपचे कार्यकर्तेही आता लढायचे कशासाठी व कुणासाठी, या विवंचनेत पडले आहेत. कालच्या घटनेचे पडसाद ग्रामीण भागात तळागाळापर्यंत उमटत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी, असे आवाहन केले होते. हा त्याग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी करावा लागणार असल्याचे कार्यकत्यांना आता कोठे उमगले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा कट उधळला ; तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद..