पाचगणी, ता.०३ : देश महासत्ता बनवायचा असेल तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वांचा, त्यांच्या आदर्शाचा विचार व्हायला हवा. महाराजांच्या काळात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सारखे स्वराज्यासाठी बलिदान देणारे मावळे होते. म्हणूनच आज आपण आहोत. असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या यांची जन्मभूमी गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील नरवीरांच्या स्मारक लोकार्पण प्रसंगी उदयनराजे बोलत होते. यावेळी आमदार सजय केळकर, आमदार मकरंद पाटील, पंकज चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, प्रवीण भिलारे, माजी सभापती विजय भिलारे, सुभाष शेडगे, इतिहासकार दत्ताजी नलावडे, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, सुभेदार चित्रपट अभिनेते अजय पुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य उभारले पण आज परस्थिती वेगळे आहे. व्यक्ती केंद्रित राजकारणामुळे लोकशाहीला बाधा येत आहे. परंतु नव्या पिढीला मार्गदर्शक असे नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक गोडवलीत होण्यासाठी लक्ष घालून नव्हे तर करून दाखविणार अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, महाराजांचे विचार रुजवायचा असेल तर
दुर्ग सेवेशीय पर्याय नाहीछत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा विचार रुजवायचा असेल तर या जन्मभूमीत नतमस्तक व्हायला हवे.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता पाचगणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ही मिरवणूक गोडवली येथे आली. मिरवणूकीत अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गावात रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.
यावेळी दुर्ग जागर समिती सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ९४ गावातील मालुसरे परिवार, सरपंच मंगेश पवार, उपसरपंच विष्णू मालुसरे, माजी सरपंच सुरेश मालुसरे, पोलिस पाटील विशाल पवार, योगेश मालुसरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मालुसरे, जेष्ठ नागरिक तुकाराम मालुसरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद पवार यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच अंकुश मालुसरे यांनी तर आभार राजाराम मालुसरे यांनी मानले.