बारामती : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुळे पुढे म्हणाले की, प्रगती आणि डेक्कन एक्स्प्रेस सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी एकदमच लवकर आहे. परिणामी बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत. बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही.
परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटी ने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागतो. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडण्यात यावी. अशी माहिती त्यांनी दिली आहे.