सागर घरत
Karmala News : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल खचला आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची किरकोळ दुरुस्ती करून हलक्या वाहनांची वाहतूक पुलावरून सुरु आहे. मात्र, करमाळा तालुक्यासह तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी 55 कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मिळवली होती.(Karmala News)
ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल खचला आहे.
या कामावर नवीन सरकारने स्थगिती दिलेली होती. ती स्थगिती उठवून प्रत्यक्षात त्या पुलांचे कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने पुलाच्या 38 कोटी 66 लाख 31 हजार 470 रुपयाचे निविदा प्रस्तावास आज (दि.26) महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.(Karmala News)
याबाबत पुढे ते म्हणाले, ‘डिकसळ पुलासाठी एकूण 55 कोटी निधी मंजूर असून, सदर पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम उर्वरित निधीमधून केले जाणार आहे. त्याचे टेंडर नंतर निघणार आहे. डिकसळ पुलाचे काम विजय एस. पटेल शिरपूर, धुळे या कंपनीला मिळाले असून, दोन वर्षांमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.(Karmala News)
भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्र्यांची मागितली वेळ
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळालेल्या व आता अजित पवार उपमुख्यमंत्री होऊन सत्तेत सहभागी झालेल्या सरकारने या पुलाच्या निविदा प्रस्तावास मंजुरी दिली असून, त्याचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या डिकसळ पुलाचे भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची वेळ आपण मागितली असून, त्यांनी वेळ दिल्यानंतर डिकसळ पुलाचा भूमिपूजन समारंभ होईल, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.(Karmala News)