पुणे : भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
याबाबत रक्षा खडसे म्हणाल्या, “एकनाथ खडसे हे अमित शाह यांच्या भेटीला गेले होते, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र अमित शाह आणि खडसे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.”
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असताना, माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली होती.
याबाबत खडसे एकनाथ खडसे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे.”