मुंबई : ‘केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. या प्रकरणी दोषी आढळल्यास १ लाख रूपयांचा दंड ठोठावला जाणार’, असे सांगण्यात आले. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता आहे, असे म्हणत मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत आव्हाड म्हणाले, “असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा चांगला अभ्यास करून घेण्याची पालक-शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील-पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत.”असे म्हणत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच््या निर्णयाला विरोध केला आहे.
१६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे. ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे. त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा. मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की म्हणतील, आता घरातच रहा, अशा शब्दांत आव्हाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.