Jalgaon News : जळगाव : वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करणं टाळणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच वंचितवर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे वंचित आघाडीला महाविकास आघाडीचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती केली आहे. आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र, शरद पवार यांनी केलेल्या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नांना खिळ बसणार असल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार आज जळगावमध्ये आहेत. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी वंचित आघाडीवर टीका केली. पवार यांना पत्रकारांनी दुसराच प्रश्न विचारला होता. (Jalgaon News) त्याला उत्तर देताना पवार यांची गाडी रूळावरून घसरली आणि त्यांनी थेट वंचित आघाडीचं अंतरंगच उघडं केलं. मागच्या निवडणुकीत आम्हाला वंचित बहुजन आघाडीमुळे नुकसान सहन करावं लागलं होतं, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडी ही बी टीम
काही वेळी राजकारणात स्वत: लढायचं असतं. दुसऱ्याच्या पायात पाय घालण्यासाठी एक दोन टीम तयार करायच्या असतात. त्याला साधारणत: ही राजकारणाची बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की नाही ते कळेलच, असे उद्गगार शरद पवार यांनी काढले. पवार म्हणाले की, त्यांनी कुठं काम करावं हा लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला काही आक्षेप घ्यायचा नाही. पण महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, हे माहीत नाही.
यापूर्वी शरद पवार यांनी भाजप कोणकोणत्या राज्यात नाही, याची यादीच वाचली होती. जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप नसणाऱ्या राज्यांचा पाढा वाचला. (Jalgaon News) केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत भाजप आहे. मध्यप्रदेशात आहे. पण मध्य प्रदेशात भाजपचं राज्य नव्हतं. तिथे कमलनाथ यांचं सरकार होतं. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. गोव्यात काँग्रेस होती. आमदार फोडले. खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, असं त्यांनी सांगितलं.
मोठी आश्वासने द्यायची आणि पूर्ती करायची नाही. शेतीमालाचा भाव दुप्पट करणार असल्याचं सांगायचं आणि काही करायचं नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. नोकऱ्या दिल्याचं सांगतात, प्रत्यक्षात काही नाही. (Jalgaon News) या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर परिवर्तन हाच त्यावर पर्याय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. बहुसंख्य राज्यात लोकांनी भाजपला बाजूला ठेवलं आहे. लोक देशपातळीवरही वेगळा विचार करतील असं वाटतं. असं असेल तर एकत्र बसून सर्वांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या इच्छांची पूर्तता केली पाहिजे, असे सूचक मत त्यांनी व्यक्त केले.
आता निवडणुका लवकर होतील की नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच ठरवतील. राज्यांचे निकाल पाहिल्यानंतर कोणताही शहाणा माणूस निवडणुका घेईल असं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.