पुणे : वर्धा जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली. नदी नाल्यांना पूर आल्याने स्थलांतरीत केलेल्या अतिवृष्टीग्रस्तांशी त्यांनी प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवास केंद्रास भेट देऊन संवाद साधला.
यावेळी खासदार रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.रणजित कांबळे, आ. समिर कुणावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजु तिमांडे, सुनिल गफाट आदी उपस्थित होते.
हिंगणघाट तालुक्यातील शेडगाव येथे नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेती पिकांचे नुकसान झाले. या ठिकाणी भेट देऊन उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. हिंगणघाट शहरातील महाकाली नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. अनेक घरांचेही नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्तांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे वना नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. पूरामुळे शेतपिकांसह नदी काठावरील गावांनाही फटका बसला. पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासोबतच अद्यापही तुडूंब भरुन वाहत असलेल्या या नदीची त्यांनी पाहणी केली. हिंगणघाट तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. शहरातील बाधित नागरिकांना हिंगणघाट शहरातील बी.जी.एम.एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात हलविण्यात आले असून या ठिकाणी त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या तात्पुरत्या निवास केंद्रास भेट देऊन तेथील बाधितांशी देखील उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
हिंगणघाट तालुक्यातीलच कान्होली या गावास अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडला होता. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. येथील नागरिकांना प्रशासनाने गावाच्या नवीन वस्तीतील ग्रामपंचायत इमारतीत हलविले आहे. या नागरिकांची देखील उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांचे म्हणने त्यांनी ऐकुण घेतले. या ठिकाणी जिल्ह्याच्या पूर परिस्थिती बाबत खासदार, आमदार व जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन माहिती घेतली.
शेतक-यांना योग्य मदत देऊ – देवेंद्र फडणवीस
जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थितीत उत्तम काम केले आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शेवटचा व्यक्ती देखील सुरक्षित ठिकाणी येई पर्यंत बचाव पथकांचे काम सुरुच राहील. नुकसान झालेल्या शेतक-यांना यापूर्वी आम्ही शासन निर्णय बदलवून मदत केली होती. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांना योग्य मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नुकसानीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.