दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून लवकरच राष्ट्रवादीत उभी फुट पडणार आहे. पक्षातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वाटेवर असल्याच्या हालचाली मागील काही महिन्यापासून तालुक्यात सुरु आहेत. या पक्ष प्रवेशाबाबत संबंधितांच्या राज्याचे माजी राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे विजय शिवतारे यांच्या बरोबर बैठकाही पार पडल्या आहेत.
सदरचा होणारा पक्षप्रवेश खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या दोन-तीन दिवसांत होणार असून यामध्ये तालुक्यातील अनेक माजी पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन व सरपंच यांचा समावेश असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून इंदापूर तालुक्याची ओळख आहे. पवार यांच्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता या तालुक्यात होता. साहेबांनी सांगावे आणि इंदापूरकरांनी ऐकावे असा नियम आजवर लागू झाला आहे.
त्याचीच प्रचीती सन २०१४ आणि सन्मान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आली आहे. विधानसभेचा तो विजय हा साहेबांच्या शब्दाचा परिणाम असेच होते. परंतु आता तसे राहिले नसल्याचे चित्र दिसत आहे.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील पक्षाच्या जुन्या-जाणत्या जेष्ठ कार्यकर्त्याला जागा नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षातील फुटीच्या प्रक्रियेला सन २०१९ ची विधानसभेची निवडणुक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या विधानसभा निवडणुकी नंतर जी फळी तालुक्यात उदयाला आली ते पाहता जुन्या जाणत्या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला केले जात असल्याची खंत तालुक्यातील नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालूनसुद्धा या बाबींकडे जाणूनबुजून कानाडोळा केल्याचा गंभीर परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेला पक्षाच्या विरोधात काम केलेली मंडळी विधानसभेला व्यासपीठावर कसे ? असा प्रश्न पक्ष नेतृत्वाला विचारला गेला होता. यावर पक्ष विचार करत नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय होत असल्याचे तालुक्यातील पश्चिम भागातील एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
तालुक्यावर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणि ताकद असूनही कार्यकर्त्यांकडून आगामी काळात तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पत्करलेली बंडखोरी ही राष्ट्रवादीला काँग्रेसला परवडणारी नसल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.