दीपक खिलारे
(Indapur News) इंदापूर : नवीन रोजगाराची निर्मिती न झाल्याने नोकरीसाठी आजचा तरुण वर्ग तळमळत आहे. तरुणांच्या या परिस्थितीस आमदार दत्तात्रय भरणे यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप करुन त्यांचा तळतळाट आमदारांना घ्यावा. लागेल असा घणाघात इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी केला.
टीकेला प्रत्युत्तर …!
इंदापूर तालुक्यात रविवारी झालेल्या कार्यक्रमात भरणे यांनी विकास कामे करण्यास मी खंबीर असल्याने विरोधकांनी शांत बसावे अशी टीका केली. त्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. जामदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विकास काम कसे करावे हे मला माहित आहे. अशी स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या भरणे यांनी गेल्या ८ वर्षात किती तरुणांना नोकऱ्या दिल्या? शेतकऱ्यांसाठी नद्यांवरती किती बंधारे व वीज उपकेंद्रे तसेच प्रक्रिया उद्योग काढले? किती विद्यालये काढली? किती सहकारी संस्था निर्माण केल्या? तालुक्यात सिंचनाखाली किती नवीन क्षेत्र आणले? जनतेच्या आरोग्यासाठी इंदापूर व इतर ठिकाणी नवीन काय सुविधा उपलब्ध केल्या ? हे नेहमीप्रमाणे देवाची शपथ घेऊन भरणे यांनी जाहीर करावे. असे आव्हान जामदार यांनी आमदार भरणे यांना दिले आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामांची दूरदृष्टी आमदारांकडे नाही. खोटे बोल पण रेटून बोल, दिसेल त्या देवाची शपथ घेणे, जनतेची दिशाभूल करणे आदी त्यांची नाटके जनतेने ओळखली आहेत, जनतेला फार काळ फसवता येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असा टोलाही अँड जामदार यांनी लागावला.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने भाजपच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये विकास कामांसाठी मोठा निधी येऊ लागल्याने भरणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते बेताल वक्तव्य करीत आहेत.
राज्यात आता महाविकास आघाडी सरकारची सत्ता नसून शिवसेना-भाजपची सत्ता आहे, हे विरोधी पक्षाचे भरणे यांनी मान्य करावे. त्यामुळे तालुक्यातील विकास कामांचे खोटे श्रेय घेण्याची सवय त्यांनी आता बंद करावी, असा अँड. जामदार यांनी आमदार भरणे यांना दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!