Indapur News इंदापूर : इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवी येत्या पाच वर्षात ५०० कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. (Indapur News) तसेच आगामी काळात बँकेच्या नवीन शाखा उघडण्यात येतील, अशी माहिती बँकेचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता.१८) रोजी दिली. (Indapur News)
इंदापूर अर्बन बँकेची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक बँकेचे संस्थापक माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर आज मंगळवारी (ता.१८) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी देवराज कोंडीबा जाधव ( निमगाव केतकी ) व उपाध्यक्षपदी सत्यशील भिकाजीराव पाटील (वालचंदनगर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंडचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अध्यक्ष देवराज जाधव व उपाध्यक्ष सत्यशील पाटील यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी शंकरराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, ग्रॉस एनपीए आगामी काळात शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे.
बँकेच्या संचालक मंडळामध्ये ३ डॉक्टर, उद्योजक, वकील, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रात काम करणारे तसेच प्रगतशील शेतकरी, युवक यांचा समावेश करून, बँकेला चांगला चेहरा देण्याचे काम करण्यात आले आहे. इंदापूर अर्बन बँक ही तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक झाली आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर अर्बन बँकच्या तज्ञ संचालकपदी अँड.विजय भानुदास पांढरे (जांब) व तानाजीराव उर्फ बाबा कृष्णराव निंबाळकर (सणसर) यांना संधी देण्यात आली आहे. असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. यावेळी नूतन अध्यक्ष देवराज जाधव व उपाध्यक्ष सत्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेचे नूतन संचालक संदीप रमाकांत गुळवे (निमगाव केतकी), मच्छिंद्र मारुती शेटे-पाटील (इंदापूर), सुभाष लक्ष्मण बोंगाणे (पडस्थळ), मनोज विक्रम मोरे (माळवाडी नं.२), स्वप्निल बाळासाहेब सावंत (इंदापूर ), संजय महादेव जगताप (डाळज नं.२), लालासाहेब आबासाहेब सपकळ (तावशी), विकास शिवाजीराव देवकर (लोणी देवकर), गोविंद दिगंबर रणवरे (निमसाखर), डॉ.मिलिंद किसनराव खाडे (इंदापूर), संजय बाबुलाल रायसोनी (भिगवण). डॉ.अश्विनी अभिजीत ठोंबरे (इंदापूर), डॉ.दिपाली शिवाजीराव खबाले ( इंदापूर), अविनाश दामोदर कोथमिरे (इंदापूर), भागवत मनोहर पिसे (इंदापूर) उपस्थित होते.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बाभुळगावच्या नूतन सरपंच रेश्माताई सुखदेव गरगुडे यांचा तसेच नेट परीक्षेत ६२६ गुण मिळालेबद्दल वैष्णवी जगन्नाथ सुरवसे हिचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे यांनी केले. यावेळी इंदापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दूधगंगाचे संकलन १ लाख लिटरच्या घरात – हर्षवर्धन पाटील
दूधगंगा दुध संघाचे दैनंदिन संकलन हे सध्या ९३ हजार लिटर झाल्याने दुध संकलन हे १ लाख लिटरच्या घरात पोहचले आहे. दूधगंगा दूध संघामार्फत प्रत्येकी १० दिवसाला ५ कोटी रुपयांचे पेमेंट बँकेत जमा केले जात आहे. दूधगंगा संघाचे संकलन आगामी काळात २ लाख लिटर पर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.