पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने हडपसर येथे उभारण्यात आलेले ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून ‘एकनाथ शिंदे उद्यान’ उभारले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये दुपारच्या सुमारास या उद्यानाचे उद्घाट मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र या उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास स्वयंसेवी संघटनांनी कडाडून विरोध केला. दरम्यान, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द केल्याच्या वृत्ताला माजी स्थानिक नगरसेवक प्रमोद बानगिरे यांनी दुजोरा दिला आहे.
महापालिकेचा उद्यानांना नाव देण्याचा ठराव…
महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना नाव देण्याबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसित केले आहे. या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. याला स्वयंसेवी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.