सागर : सागर येथील बहुचर्चित जगदीश यादव यांच्या हत्याकांडातील आरोपी असलेले भाजपचे नेते मिश्री चंद गुप्ता यांच्या ५ मजली हॉटेलची इमारत स्फोट करून पाडण्यात आली आहे. यांमुळे उत्तर प्रदेश प्रमाणेच गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम आता मध्यप्रदेश राज्यातही सुरु झाले असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे नेते मिश्री चंद गुप्ता यांनी दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सची परवानगी असतानासुद्धा पाच मजल्यांचे हॉटेल उभे केले होते. त्यावर प्रशासनही कोणत्याही प्रकारची कारवाई करत नव्हते. परंतू, हत्येच्या आरोपात सापडल्याने भाजपानेही त्याच्या डोक्यावरून हात काढून घेतला. यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मिश्री चंद गुप्ता यांचे हॉटेल पाडण्यासाठी इंदौरहून टीम बोलविण्यात आली होती. टीमने हॉटेल पाडण्यासाठी तब्बल १२ तास काम गेले. इमारत पाडण्यासाठी सुमारे ८० किलो दारुगोळा, ८५ जिलेटिन कांड्यांच्या वापर करण्यात आला होता. दोन वेळा स्फोट करावे लागले. एकदा दुपारी तर दुसऱ्यांदा रात्री आठच्या सुमारास स्फोट करण्यात आले. दुसऱ्या स्फोटनंतर काही सेकंदातच हॉटेल जमीनदोस्त झाले.
मिश्री चंद गुप्ता याचा भाऊ आणि पुतण्याने निवडणुकीच्या वैमनस्यातून जगदीश यादव या तरुणाचा थार गाडीने ठेचून २३ डिसेंबर रोजी खून केला होता. मृत तरुण जगदीश यादव हा अपक्ष नगरसेवकाचा पुतण्या होता. यानंतर भाजपने आरोपींची पक्षातून हकालपट्टी केली होती. हत्याकांड झाल्यापासून हे हॉटेल पाडण्याची मागणी होत होती. या घटनेनंतर तब्बल १२ दिवसांनी हे हॉटेल उद्ध्वस्त करण्यात आले. या प्रकरणी मक्रोनिया पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बहुचर्चित जगदीश यादव यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी लवी गुप्ता यांच्यासह हनी, लकी, वकील चंद गुप्ता आणि आशिष मालवीय यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मिश्री चंद गुप्ता आणि त्यांचे दोन भाऊ धर्मेंद्र आणि जितेंद्र हे फरार आहेत.