बंगळूर : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा फतवा कर्नाटक सरकारने काढल्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अजूनच चिघळण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भात कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्र पाठवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि प्रशासन देखील रोज नवीन कुरापती काढत आहेत. यामुळे सीमा प्रश्न हा जास्त जटील आणि गुंतागुंतीचा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकारने सीमा प्राशनासाठी समन्वय समितीची स्थापना केली होती.
या समितीमध्ये चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई याचा समावेश आहे. हे दोन्ही मंत्री ६ डिसेंबर रोजी कर्नाटक येथे जाणार होते. या पार्शवभूमीवर कर्नाटक सरकारने हा फतवा काढला आहे.
चंद्रकांत पाटील हे उद्या (३ डिसेंबर) रोजी कर्नाटकात जाणार होते,. परंतू ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कर्नाटकातील अनेक आंबेडकरवाद्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
आम्ही काय सोयी-सुविधा देऊ शकतो, हे सांगण्यासाठी जाणार आहे. त्यांच्यासाठी निर्णय घ्यायला जाणार असून तेथील लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत, चिथावणी द्यायला जाणार नसल्याचे पाटील यांनी सांगत कर्नाटक सरकारला चिमटा घेतला.