सुरेश घाडगे
परंडा : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक यादरम्यानच्या रस्त्याचे तत्काळ मजबुतीकरण सुरु करण्यात यावे. अशी मागणी मनसेच्या वतीने परंडा मुख्याधिकारी मानीषा वडेपल्ली यांच्याकडे केली आहे.
परंडा मनसेच्या वतीने मुख्याधिकारी मानीषा वडेपल्ली यांना काल सोमवारी (ता.१२) निवेदन देण्यात आले. मनसे शहर अध्यक्ष आरुण खडके, जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख ,जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब क्षीरसागर, रोहिदास मारकड, किशोर गायकवाड, मधुकर ठोसर व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक हा रस्ता नगरपरिषद, किल्ला व बसस्थानक या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्र मधून तसेच आसपासच्या राज्यामधून पर्यटक परंडा शहरामध्ये येत असतात. पर्यटक शहरामध्ये येतात हे परंडा शहरवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, किल्ल्या मध्ये जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.
या रस्त्यावरून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे. ग्रामीण भागामधील शेतरस्ते या रस्त्यापेक्षा चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. परंडा शहरामध्ये असलेल्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे नगरपालिकेने लक्ष देऊन रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी तात्काळ निर्णय घ्यावा. असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
याबाबत बोलताना मनसे शहराध्यक्ष आरुण खडके म्हणाले कि, पुढील आठ दिवसात रस्त्यासंदर्भातील समस्या सोडवाव्यात. तसेच रस्त्याचा कार्यवाही केलेला अहवाल दाखवावा. अन्यथा परंडा शहरवासीयांना व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना होत असलेली असुविधा या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यपद्धतीने नगरपालिकेच्या विरोधात मोठे जनांदोलन करणार आहे.