दिनेश सोनवणे
दौंड : छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवरायांचे शौर्य, पराक्रम पाहायचा असेल तर तो आपल्याला गड-किल्ल्यांच्या इतिहासातून स्पष्ट होते. भावी पिढीला शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गड-किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
दौंड येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान आणि रोहित राजेश पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गड-किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अआले होते. यावेळी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, रोहित पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कुल म्हणाले कि, शिवाजी महाराजांनी गड-किल्ले बांधले आणि जिंकले देखील. या गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यांच्या इतिहासाची परंपरा कार्यरत ठेवायची असेल तर किल्ले स्पर्धांचे आयोजन काळाची गरज आहे.
प्रेमसुख कटारिया म्हणाले, मुंजाबा सेवा प्रतिष्ठानने कायमच सामाजिक बांधिलकी जोपासून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढीपर्यंत चांगले आदर्श निर्माण होण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.
किल्ले स्पर्धांचे आयोजक रोहित पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत करायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनविणे हा पर्याय असून, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे.