ठाणे : महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. तसेच खोटे सांगाल तर भाजपाची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.
ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या अंतर्गत ते भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, भाजपा ठाणे विभाग संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, भाजपा भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी आणि आमदार महेश चौघुले उपस्थित होते.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्ता गमावल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष सातत्याने चुकीची माहिती पेरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. सातत्याने युती सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटे सांगाल तर भाजपाची संघटना रस्त्यावर उतरून खोट्याचा विरोध करेल. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात राज्याला बर्बाद केले, त्याबद्दलचे सत्य जनतेसमोर सांगू.असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी केलेले अफाट कार्य, त्यांची राज्याच्या विकासाची व्हिजन, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे उत्तूंग नेतृत्व याचा विचार करावा तसेच आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा, असा टोला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला.