पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावर जन्मोत्सव साजरा होतोय त्याच ठिकाणी भगवा ध्वज नाही, अशी खंत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
या निमित्त लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर भेट देण्यासाठी येत असतात. अशात शिवजन्मोत्सवाच्या शासकिय कार्यक्रमावर खासदार कोल्हेंनी बहिष्कार घातला आहे. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज नसल्याने खंत व्यक्त करत याची जाणीव करुन देण्यासाठी हे आंदोलन उभं केलंय याला शिवभक्तांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पुढल्या शिवजयंतीला शिवनेरीवर भगवा नसेल तर, राज्य व्यापी आंदोलन केले जाईल. राज्य सरकारने यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन क्रेंद्रशासनातून यासाठी लवकरात लवकर परवानगी मिळवावी. जे सरकार कलम ३७० हटवतं तर आर्केलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या नियमामध्ये एक छोटा बदल करून भगवा का फडकवू शकत नाही?, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
कोल्हे गडाच्या मध्यावर बसले आहेत. तसेच शासकीय कार्यक्रम संपल्यानंतर शिवभक्तांमधून ते शिवनेरी गड चढणार आहेत. पुढचे तीन तास कोल्हे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याच्या पहिल्या पायरीवर बसणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी भगवा फडकवला जावा याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पाऊलं उचलेली नाहीत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आता राज्यशासनाला पुढील शिवजयंती पर्यंतचा अल्टीमेट दिला आहे.