पुणे : मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे, असे आव्हान देत कसब्यातील जनतेला बदल हवा आहे, कसब्यात परिवर्तन होणार, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून यावेळी कसब्यात निश्चितपणे बदल होईल. जनतेला बदल हवा आहे. कारण दोन दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. विशेषत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडले आहे. याचा राग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल आणि शंभर टक्के परिवर्तन होईल. कसब्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित निवडून येईल असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला.
कसबा पेठ पोट निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर दुसरीकडे धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कसबा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आणि मेळावे घेऊन मतदारांशी संपर्क साधला.
कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा जनतेतील उमेदवार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडी एकत्रित काम करत असल्याने भाजपला भीती वाटत आहे. त्यामुळे आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री प्रचारासाठी येत आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात म्हणाले, “निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेला निर्णय हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. न्यायालयात याबाबत योग्य निर्णय होईल, असे थोरात यांनी म्हटले.”
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात शरद पवारही उतरणार..!
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बुधवारी (ता. २२) शरद पवार उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. बुधवारी (उद्या) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ते चिंचवड येथे तर दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत शरद पवार कसबा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
दरम्यान, कसबा आणि चिंचवडमध्ये सात ते आठ छोटे मेळावेही ते घेणार आहेत. कसबा, चिंचवडला चक्कर मारून जा, म्हणून जातोय, अशी मिश्कील टिप्पणी देखील खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.