मुंबई : महापुरुषांचा अपमान मी स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. मात्र, या व्यक्तींच्या कामाचा आदर म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे, असे स्पष्टीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या व्यक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत आले होते. यामुळे विरोधकांनी राज्यातील वातावरण देखील चांगलेच तापविताना राज्यपालांना कार्यमुक्त करण्याची देखील मागणी करण्यात येत होती. या पार्शवभूमीवर राज्यपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपले स्पष्टीकरण सादर केले.
कोरोना साथीच्या काळात अंक लोक घरात बसले असताना मी महाराष्ट्रभर फिरलो, गड – किल्ल्यांवर गेलो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशासाठी आहे, असे देखील राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.
माझ्याकडून एखादी चूक झाली तर खेद व्यक्त करण्यात मला कधीही कमीपणा वाटत नाही. मात्र महापुरुषांबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, हे नमूद करताना त्यांनी माध्यमांवर देखील रोष व्यक्त केला आहे.