लातूर : ग्रामपंच्यात निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी सर्वच नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. यासाठी तहान-भूक विसरून प्रचार करताना दिसून येत आहेत. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत आपल्या स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणे अपेक्षित असताना शारीरिक त्रास सहन करत प्रचार करणे लातूरमधील उमेदवाराला महागात पडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या ग्रामपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या रविवारी म्हणजे १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुका संपन्न होणार असल्याने सर्वच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. लातूर जिल्ह्यात देखील निवडणुका होत आहेत.
लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पती अमर नाडे यांनी त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करत होते.
यासाठी पती अमर नाडे यांनी मुरुड येथील सार्वजनिक चौकात सभेचे आयोजन केले होते. प्रचाराची जाहीर सभेत भाषण करत असताना अमर नाडे कोसळले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
भाषण करत असताना अमर नाडे (वय ४५) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उमेदवाराचे पती असलेल्या अमर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.