पुणे : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे, निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.३०) विधानसभेत दिली आहे.
सन २०२२-२३ मध्ये एलएलबी अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उशीरा प्रवेश सूचना निघाल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याच्या संदर्भात आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील विविध विद्यापीठे हे वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतात आणि निकाल जाहीर करतात. त्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख बदलत जाते. या सर्व विद्यापिठांच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता यावी, यासाठी राज्यपाल यांच्या दालनात एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे.
तसेच मे महिन्याच्या परीक्षा घेण्यात याव्या आणि जून अखेर निकाल लावून एक ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.